“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो”

 

सातारा | महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांच्या मागे ईडीची ससेमिरा मागे लागल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक नेत्यांचा तपास सुरू केला आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब, हसन मुश्रीफ तसेच अजित पवार अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. यातच आता भाजप खासदार उदयनराजे यांनी राज्यातील एकूण घडामोडींवर संताप व्यक्त केला असून, हिंमत असेल, तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो, असे म्हटले आहे.

एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे काढायचे, असे सांगत उदयनराजे यांनी भाजपसहित इतर पक्षांवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात असताना भाजपाकडून हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. मात्र आता यावर भाजपच्या खासदाराने भाष्य करून पक्षाला आरास दाखवला आहे.

जसे आपण पेरतो तसेच उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन, असे सांगत ईडी कारवाईंच्या मागे भाजप असल्याच्या आरोपांबाबत विचारले असता, कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढत बसायचे. बास झाले आता राजकारण, असे उदयनराजे यांनी ठणकावले.

Team Global News Marathi: