‘मी येणारच’ काही जमेना म्हणून सरकार अस्थिर करण्याचा डाव; शरद पवारांचा फडणवीसांवर आरोप –

‘मी येणारच’ काही जमेना म्हणून सरकार अस्थिर करण्याचा डाव; शरद पवारांचा फडणवीसांवर आरोप –

पुणे: ‘मी येणारच’ असं काही लोक सतत सांगत होते. पण ते येणारच हे काही जमेना म्हणून अस्वस्थ झालेल्या लोकांनी सत्तेचा गैरवापर करून राज्याल अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच आमच्या सत्ताधारी नेत्यांवर होत असलेल्या चौकश्या या राजकीय आकसाने सुरू आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. पण चौकशी केल्यानंतर काम संपल्यावर तिथे थांबू नये. पण बिचाऱ्या पाहुण्याचा दोष नव्हता. त्यांना वरुन आदेश होते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी हे पावलं टाकली जात आहेत. यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसतोय, असं पवारांनी सांगितलं.

अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. तिथे जाऊन मी चौकशी केली. कागदपत्र पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. त्यांच्या घरी ५ दिवस १४ ते १५ लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्याचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल तक्रार नाही. त्यांना हाती काही लागलं नाही तरी त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच -पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केला.

काही लोक समर्थन करण्यासाठी पुढे आले. खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येतात. कधी माजी मुख्यमंत्री, कधी मुंबईचे त्यांचे माजी अध्यक्ष पुढे येतात. अशा प्रकरणात त्या यंत्रणा, त्यांच्या प्रवक्त्यांनी भाष्य केलं तर मी समजू शकतो. पण भाजपचे नेते पुढे येतात. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्यासाठी सर्व सुरु आहे. हे दिसून येतं असंही त्यांनी सांगितलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा आरोप केल्यानंतर लगेच तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे? राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?

शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं होतं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी का बसवलं नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या सवालावर शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे सांगतानाच शरद पवार यांनी फडणवीसांना कानपिचक्याही दिल्या आहेत.

नव्या या सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे आली होती. मात्र आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार असं विचारलं गेलं. त्यावेळी माझ्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरेंचा हात मी स्वत: वर केला आणि हे नेतृत्व करतील असं जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते. त्यांची हातवर करायची तयारी नव्हती आणि मुख्यमंत्री व्हायचीही इच्छा नव्हती. त्यांना अक्षरश: सक्तीने मी त्यांना हात वर करायला लावला. मी त्यांचा हातवर केल्याने त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता. त्यात माझाही किंचित वाटा होता, असं पवारांनी सांगितलं.

मी उद्धव ठाकरेंना मी वयाच्या तीन-चार वर्षापासून पाहिलेलं आहे. बाळासाहेब माझे मित्र होते. त्यांच्याशी माझे राजकीय मतभेद होते. पण व्यक्तिगत सलोखा अत्यंत जवळचा होता. बाळासाहेब अत्यंत दिलदार होते. या गृहस्थाने महाराष्ट्रासाठी मोठं योगदान दिलं. शिवसेनेने योगदान दिलं. त्यामुळे जेव्हा सरकार बनविण्याची वेळ आली तेव्हा तीन पक्ष समोर होते. त्यात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे होते. त्यामुळे आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला भाग पाडावी ही माझी जबाबदारी होती

. त्यामुळे मी त्यांचा सक्तीने हात वर केला. त्यामुळे त्यांची निवड झाली. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं, असं त्यांनी सांगितलं. पण माझी फडणवीसांना विनंती आहे की कृपा करून असल्या गोष्टीवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. तुम्ही पाच वर्षे उद्धव ठाकरेंसोबत काम केलं. त्यामुळे त्यांना परस्परांचा परिचय निश्चित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर आरोप करणं योग्य नाही. म्हणून मी मुद्दाम ही वस्तुस्थिती सांगितली, असं ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: