मोहोळजवळ मालट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

मोहोळजवळ मालट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

मृत दुचाकी चालक होते सेवानिवृत्त एसआरपीएफ जवान

सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकने डबलसीट दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. हा अपघात आज ( २३ नोव्हेंबर ) रोजी दुपारी सव्वा एक वाजता कोळेगाव रेल्वे पुलाजवळ सोलापूर – पुणे महामार्गावर घडला.

अर्जुन नामदेव थिटे (वय ६५ वर्षे,) अनिता अर्जुन थिटे (वय ६० वर्षे) दोघे रा. एसआरपीएफ कॅम्प सोरेगाव, सोलापुर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या प्रकरणी मोहोळ पोलिसात ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन थिटे राष्ट्रपती पदक विजेते जवान !
राज्य राखीव पोलीस बलामध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल अर्जुन थिटे यांना सन २००७ मध्ये राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा देखील सध्या पोलीस दलात कार्यरत आहे. दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी कोंबडवाडी येथे शोकाकुल वातावरणात थिटे पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपेक्षितपणे घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कोंबडवाडी/अनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोंबडवाडी/अनगर अर्जुन नामदेव थिटे हे सेवानिवृत्त एसआरपीएफ जवान असून सध्या ते एसआरपीएफ कॅम्प सोलापूर येथे राहण्यास आहेत. २३ नोव्हेंबर रोजी कोंबडवाडी ( अनगर ) येथील घरगुती कार्यक्रम उरकून ते त्यांची पत्नी अनिता अर्जुन थिटे यांच्यासह दुचाकीने सोलापूर कडे निघाले होते.

दुपारी सव्वा वाजण्याच्या दरम्यान त्यांची दुचाकी (एमएच १३ एके ७३३२) सोलापूर पुणे महामार्गावरील कोळेगाव रेल्वे पुलाजवळ आली असता, भरधाव वेगात सोलापूरच्या दिशेने निघालेल्या मालट्रकने (एपी ३९ व्ही ६८२९) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रकचे चाक थिटे दाम्पत्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी होऊन दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.

या प्रकरणी सचिन शंकर थिटे (रा. कोंबडवाडी, अनगर) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून मालट्रक चालक जी व्यंकटा सुरेन्द्रा जी बाबुराव (रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विजयानंद माने हे करीत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: