मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेले देहू येथील शिळा मंदिर नेमके आहे तरी कसे?

मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेले देहू येथील शिळा मंदिर नेमके आहे तरी कसे?

17 व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम यांची भक्ती करणाऱ्या आणि महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद देखील साधला. विशिष्ट प्रकारच्या राजस्थानी दगडापासून बांधण्यात आलेले हे मंदिर, संत तुकाराम यांनी ज्या शिळेवर बसून 13 दिवस ध्यानधारणा केली त्या शिळेला समर्पित करण्यात आले आहे.

पंढरपूरची वारी सुरु करण्यापूर्वी तुकाराम महाराजांचे भक्त असलेले वारकरी या शिळेचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात. या शिळा मंदिराच्या जवळच उभारण्यात आलेल्या संत तुकाराम यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण देखील पंतप्रधानांनी केले.

…म्हणून ‘त्या’ मंदिरास शिळा मंदिर संबोधले जाते

भक्तिमार्गाचे उपासक कवी आणि संत तुकाराम त्यांच्या ‘अभंग’ या प्रकारच्या भक्तीभावाने भरलेल्या काव्यरचनांसाठी तसेच ‘कीर्तने’ म्हणून प्रसिध्द असलेल्या अध्यात्मिक रचनांसाठी सुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील वारकरी समुदायामध्ये त्यांच्या साहित्यकृतींनी मध्यवर्ती स्थान मिळविलेले आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले देहू हे या संतकवीचे जन्मस्थान आहे.

संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.

असे आहे शिळा मंदिर

देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केलेल्या दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच सुबक मूर्ती आहे. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत.

संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्यानं शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे.

शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच असून संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती 42 दिवसांमध्ये उभारली आहे.

या मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून मूळ गर्भगृह 14×14 एवढ्या आकाराचे आहे. अंतर गर्भगृह 9×9 उंची 17×12 एवढी आहे.

यासाठी एकूण खर्च हा 1 कोटी 17 लाख 47 हजार 500 रुपये आला आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे, पिंपरी चिंचवड यांनी तयार केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: