तुम्ही फडणवीसांना ‘टरबुज्या’, मला ‘चंपा’ म्हणता ते कसे चालते? – चंद्रकांत पाटील

तुम्ही फडणवीसांना ‘टरबुज्या’, मला ‘चंपा’ म्हणता ते कसे चालते? – चंद्रकांत पाटील

ग्लोबल न्यूज : शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी कायम चांगले बोलत आलो आहे. मी आरक्षणासाठीच्या कायदेशीर बाबींविषयी काही गोष्टी बोललो. शरद पवार यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतु नव्हता,’ असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, शरद पवारांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते, कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. कोणत्याही नव्या आरक्षणामुळे विद्यमान आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी कराव्या लागणाऱ्या कायदेशीर तरतुदींसंदर्भाने मी बोलत होतो. राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या; तर मला चंपा म्हणतात. हे कसे चालते,’ असा सवालही पाटील यांनी केला. त्याचबरोबर ‘माझ्यादृष्टीने हा विषय आता संपला आहे. ज्यांना पवारांवरची निष्ठा दाखवायची आहे, त्यांनी बोलत राहावे, मी कोणाला घाबरत नाही,’ असेही पाटील यावेळी बोलून दाखविले.

समान विचारधारा नसलेले, एक झेंडा नसलेले पक्ष सरकार चालवत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे. कोणाचाही पायपोस कोणाला नसल्याने एकमताने निर्णय होत नाहीत. यात जनता भरडली जात आहे. शाळा सुरू करण्याबाबत धड निर्णय घेतलेला नाही. विद्यापीठाच्या परीक्षा घ्यायच्या म्हणून घेतल्या. कॉर्पोरेट कंपन्या या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बाजूला ठेवतील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका न घेतल्यानेच एमपीएससी परीक्षा, अकरावी प्रवेश आदी बाबी रखडल्या आहेत. यात राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याचे परिणाम शिक्षक-पदवीधर निवडणुकीत दिसून येतील,’ असे पाटील म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: