इतिहास पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचा…..वाचा सविस्तर-

इतिहास पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचा…..वाचा सविस्तर-

गोष्ट आहे १८९३ सालची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत आणि सत्यशील प्रस्थ होते. बुधवारपेठेतील दत्त मंदिर ही त्यांची राहण्याची इमारत होती. त्यावेळी पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ यांच्या मुलाचे देहावसान झाले. यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ दु:खात होते. त्यांचे गुरू श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले. महाराजांनी त्यांना श्री दत्त महाराज आणि श्री गणपतीची मूर्ती स्थापन करुन, “रोज त्याची पूजा करा.. जसे अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते तसेच ही दोन दैवते तुमचं नाव उज्वल करतील. याचा सांभाळ तुम्ही मुलाप्रमाणे करा” असे सांगितले. यानंतर श्रीमंत दगडूशेठ यांनी दत्त महाराजांची एक संगमरवरी तर गणपतीची मातीची मूर्ती बनवली होती. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली होती. आज पुण्यातील गणपतींच्या यादीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नाव आघाडीवर आहे.

लोकमान्य टिळकांनी १८९४ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. दगडूशेठ हलवाईची दुसरी मूर्ती १८९६ साली तयार करण्यात आली. यानंतर त्या मूर्तीचा उत्सव होऊ लागला. याच काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु तेथील परिसरातील नागरिकांनी आणि तत्कालीन कार्यकर्त्यांनी ही गणेशोत्सवाची परंपरा सुरुच ठेवली. हा गणपती त्याकाळी कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहुलीचा हौद, सार्वजनिक गणपती अशा नावाने प्रचलित होता.

सन १९६७ साली या गणपतीचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. १८९६ साली तयार केलेल्या या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. यानंतर नवीन मूर्ती बनवण्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार नागेश शिल्पी यांना पाचारण केले गेले. नमुना म्हणून एक लहान मूर्ती बनविण्यात आली. बाळासाहेब परांजपे यांनी प्रोजेक्टरचा वापर करून पडद्यावरून कार्यकर्त्यांना ही मूर्ती दाखवली. आधीच्या मूर्तीशी ही मूर्ती मिळत आहे याची खात्री करत सर्वांच्या अनुमतीने नवीन मूर्ती तयार केली गेली. ही मूर्ती बनवण्यासाठी त्याकाळी एक हजार एकशे पंचवीस रुपये (११२५/-) इतका खर्च आला होता.

१९८४ मधील गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर गणपतीची मंदिरात स्थापना करण्यात आली. त्यावेळी मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे आणि मामासाहेब रासने तसेच आप्पासाहेब सुर्यवंशी होते. यानंतर भाविकांसाठी मंदिर अपुरे पडू लागल्याने २००२ मध्ये भव्य मंदिर (जे आता आहे) उभारण्यात आले.

– संकलित.

ग्लोबल न्युज नेटवर्क: