हिंदी भाषा भवनाविरोधात ‘मराठी एकीकरण’ आक्रमक

 

आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवरून मीरा भाईंदर महापालिकेने मीरा रोडच्या हाटकेश भागात सुविधा भूखंडावर हिंदी भाषा भवनचे भूमिपूजन रविवारी आयोजित केले असून त्याला मराठी एकीकरण समितीने विरोध करीत आंदोलन केले. मराठी राजभाषा असून ‘मराठी भाषा भवन’ हवे असताना हिंदी भाषिकांच्या मतांसाठी व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे भवन महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.

ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये विकासकांकडून उपलब्ध होणाऱ्या नागरी सुविधा भूखंड तसेच शासकीय जमिनीवर विविध भाषिक तसेच समाजांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या इमारतींचे भूमिपूजन सुरू केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन, वारकरी भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन यांची भूमिपूजने अलीकडेच करण्यात आली.

रविवार २७ नोव्हेंबर रोजी हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवनाचे भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजनसाठी उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री स्वतंत्र देव सिंह, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, अभिनेते जितेंद्र कपूर आदींसह उत्तर भारतीय समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी हिंदी भाषिक कार्यक्रमांचे आयोजन भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. हिंदी भाषा भवनच्या अंतर्गत सजावटीसाठी राज्य सरकारकडून एक कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. भवनाची इमारत ‘कन्स्ट्रक्शन टीडीआर’च्या माध्यमातून उभी राहणार आहे.

हिंदी भाषिकांची शहरात मोठी संख्या असल्याने हे भवन उभे राहत आहे. येथे हिंदी साहित्यविषयक कार्यक्रम होतील. हिंदी पुस्तके, कवी संमेलने, परिसंवाद, व्याख्यानमाला, नाटके असे कार्यक्रम होऊ शकतात. चांगल्या कामात कोणीही विनाकारण प्रसिद्धीसाठी राजकारण करू नये, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. तर दुसरीकडे हिंदी भाषा भवनला मराठी एकीकरण समितीने विरोध केला आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, प्रदीप सामंत यांनी भवनावर टीका केली. समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. काशीमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले.

Team Global News Marathi: