नागपुरात उच्च शिक्षित दाम्पत्याची दोन मुलासह आत्महत्या
नागपुरात उच्च शिक्षित दाम्पत्याची दोन मुलासह आत्महत्या, जिल्ह्याच्या कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत धक्कादायक घटना, पती धीरज राणे प्राध्यापक, तर पत्नी सुषमा राणे डॉक्टर, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या अशी मृतांची नावं, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, कोरोडी पोलिसांचा तपास सुरु आहे.
पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित. पती प्रोफेसर तर पत्नी डॉक्टर. एक मुलगा आणि एक मुलगी, असा संपन्न परिवार. पण काय झाले कुणास ठाऊक. काल रात्री १२ वाजतानंतर या दाम्पत्याने मुलांसह आत्महत्या केली. रातोरात असे काय झाले असावे की, त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. विविध तर्कवितर्क लावणे सुरू आहे. पण कुणाला काहीही अंदाज लावता येत नाहीये. फक्त हळहळ व्यक्त होत आहे.
उच्चशिक्षित दाम्पत्याने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची अंगावर शहारा आणणारी ही घटना आज शहरानजीकच्या कोराडीतील ओमनगरात घडली. प्रा. धीरज राणे (४२), डॉ. सुषमा धीरज राणे (३८), ध्रुव (११) आणि लावण्या (६) अशी मृतांची नावे आहेत.
धंतोली येथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर सुषमा आणि रायसोनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर असलेले त्यांचे पती धीरज राणे यांनी मुलगा ध्रुव वय ११ वर्ष आणि मुलगी लावण्या वय वर्षे ६, या दोन चिमुकल्यांसकट आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्यासोबत डॉक्टरची वयोवृद्ध आई राहात होती.
मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास दाम्पत्यांशी वयोवृद्ध आईचे बोलणे झाले होते, असे निकटवर्तीयांनी सांगितले. सकाळी त्यांच्या खोलीचे दार ठोठावून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आरडाओरड केल्यानंतर घटना लक्षात आली. कोराडी पोलिसांनी घराचा ताबा घेतला असून, पोलीस निरीक्षक वझीर शेख यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.