मराठवाडा अन विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाचा अंदाज

पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे. राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. उद्या (ता.२९) मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. उन्हाच्या चटक्यासह कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली असून ऑक्टोबर हिटची चाहूल लागली आहे. त्यामुळे विदर्भातील ब्रम्हपुरी येथे ३४.१ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्यातच आंध्र प्रदेशच्या परिसरातही चक्रवाताची स्थिती तयार झाल्याने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (सोमवारी) राज्यात सर्वत्र कडक उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरण राहील.

राज्यात बुधवारी (ता.३०) धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील. गुरूवारी (ता.१) राज्यात पावसाची उघडीप राहणार असून दिवसभर ऊन पडेल. पुणे परिसरातही काही अंशी ढगाळ हवामानाची स्थिती राहील. तर अधूनमधून तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: