हे नीच राजकारण मी विसरलो नाही, उद्धवला भविष्यात कळेल; राज ठाकरेंचा व्हिडिओ वायरल

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत भूकंप आला आहे. शिवसेनेचे जवळपास ३८ हून अधिक आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केले परंतु शिंदे गटाने त्यास नकार देत आधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार सोडा अशी मागणी केली.

राज्यातील या सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जुन भाषण व्हायरल झाले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबईत मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेने मनसे फोडली. ही घटना राज ठाकरेंच्या जिव्हारी लागली. तेव्हा वेळ प्रत्येकावर येते असं विधान राज यांनी केले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज ठाकरेंचे ते भाषण पुन्हा व्हायरल होऊ लागले आहे.

यात राज ठाकरे म्हणाले होते की, ‘मी शिवसेनेतून ज्या वेळेला बाहेर पडलो, त्यावेळी सुद्धा मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. हे उद्धव वगैरे आहेत ना त्यांच्या या नीच राजकारणाचा मला कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर पडलो. मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार, नगरसेवक माझ्यासोबत बाहेर पडायला तयार होते, पण तेव्हा मी सांगितलं होतं, की मला पक्ष फोडून माझा पक्ष उभारायचा नाही.

तसेच या गोष्टी मला करायच्या नाहीत, मी करणारही नाही. पक्ष स्थापनेच्या वेळीही, कोणालाही विचारुन बघा, मी एकालाही फोनही केला नव्हता. त्यानंतर मी बाहेर पडल्यावर जे प्रेमाने येतील, ते माझ्यासोबत राहतील. त्यामुळे असलं घाणेरडं राजकारण मी कधी केलं नाही, करणारही नाही;’ असं त्यांनी सांगितले होते.

Team Global News Marathi: