हवामान खात्याचा चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा, विदर्भात उष्णतेची लाट कायम

 

हवामान खात्याने पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मंगळवारी पावसाची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

५ एप्रिल : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तर विदर्भात पाऊस पडेल. पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट येईल.

६ एप्रिल : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटात पावसाची शक्यता

७ आणि ८ एप्रिल : कोकण, गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.

पंढरपूर : शहर व तालुक्यातील अनेक गावांत रविवारी रात्री व सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यात सरासरी २.७८ मिमी पाऊस पडला असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Team Global News Marathi: