सत्तेचा वाटा निम्मा, त्यात मुख्यमंत्रीपदही येते ! हॉटेल ‘ब्लू सी’मध्ये काय ठरलं होतं?

सत्तेचा वाटा निम्मा, त्यात मुख्यमंत्रीपदही येते ! हॉटेल ‘ब्लू सी’मध्ये काय ठरलं होतं?

मुंबई : शिवसेनेने हिंदुत्त्वाचा मुद्दा कधी सोडला नाही. याउलट सन २०१४ पासून भाजपने पावलोपावली हिंदुत्वाचा अवमान केला आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी वरळीच्या सी ब्लू हॉटेलमध्ये पुनश्च हरिओम करण्याचा, पुन्हा युती करण्याचा एक सोहळा पार पडला. त्यावेळी दोघांकडून एक शब्द देण्यात आला. सत्तेचा वाटा ५०-५० टक्के असा ठरला. पॉवर शेअरींग म्हणजे सत्तेचा वाटा निम्मा असतो. त्यामध्ये, मुख्यमंत्रीपदही येते, असे म्हणत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाहांचे विधान खोडून काढले आहे.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर ठरले होते. तरीही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केल्याची टीका गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील सभेत केली होती. अमित शाहांच्या या टिकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. शहांचे हे विधान असत्याला धरुन आहे, असा पलटवार राऊत यांनी केला.

१०५ आमदारांनी राजीनामा द्यावा

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानच अमित शहांनी शिवसेनेला दिले आहे. त्या आव्हानला प्रति उत्तर देताना राऊत यांनी भाजपच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावेत, असे म्हटले आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचे १०५ आमदार निवडून आले नाहीत. शिवसेनेच्या पाठिंब्याचा त्यामध्ये वाटा आहे, भाजपने हिंमत असेल तर १०५ आमदारांचा राजीनामा द्यावा, असेही राऊत यांनी म्हटले.

हेमा मालिनी यांच्याबद्दल आदर

जळगावमध्ये आयोजित जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली होती. गुलाबराव पाटलांच्या या विधानानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. दरम्यान, यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. अशाप्रकारची तुलना यापूर्वीही करण्यात आली होती. हा हेमा मालिनी यांच्याविषयी आदर आहे. याचा काही नकारात्मक अर्थ घेऊ नये. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनीदेखील अशाप्रकारचं वक्तव्य केलं होतं. आम्हाला हेमा मालिनी यांच्याविषयी आदर आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

भाजपवाल्यांनो, बोम्मईंचे सरकार आता घालवाच !

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या विचारांचा अपमान करण्याच्या घटना वारंवार घडतात व दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशीत जाऊन छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा गौरव करतात. बसवराज बोम्मई यांनी हे तरी समजून घेतले पाहिजे. कर्नाटकात वेगळे व महाराष्ट्रात जगावेगळे अशी भाजपवाल्यांची एकंदरीत तऱ्हा दिसते. पंतप्रधानांनी काशीस मांडलेला विचार चार दिवसांनीही बंगळुरूत पोहोचला नाही. काशीत शिवरायांचा सन्मान आणि बंगळुरूत अपमान हे चालणार नाही, हे ढोंग आहे. भाजपवाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच असा टोला शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून दिला आहे.

‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची कर्नाटकची ही पहिलीच घटना नाही. बंगळुरूत शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत त्या घटनेचे पडसाद उमटले. कर्नाटकातील शिवरायांच्या विटंबनेची घटना ही छोटी घटना असल्याचे वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रयत्न केला. शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो असा सवालही शिवसेनेने केला आहे.

पुतळ्यांची विटंबना करून राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे, त्यातून वातावरण खराब करणे ही एक विकृती समाजात वाढत चालली आहे. छत्रपती शिवरायांच्या विटंबनेचे वृत्त ताजे असतानाच त्याच रात्री बंगळुरूत क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याचे समोर आले आहे.

राणी चेन्नम्माच्या पुतळ्याची विटंबना होण्याचे प्रकार घडले आहेत व मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात त्याप्रमाणे या किरकोळ घटना नक्कीच नाहीत. बेळगावसह सीमा भागात ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा द्यायला भाजपा सरकारने बंदी घातली आहे. बेळगाव महानगरपालिकेवरील शिवरायांचा भगवा झेंडा जबरदस्तीने खाली उतरवला आहे.

मनगुत्ती येथील शिवरायांचा पुतळा रातोरात जेसीबी लावून हटवला. हे सर्व कृत्य करताना दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांना शिवरायांचे शौर्य आठवू नये याचे आश्चर्य वाटते. २०१४ साली मोदी महाराष्ट्रात मते मागायला आले तेव्हा शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मोदींना आहेत अशा आशयाची पोस्टर्स व मोठे फलक सर्वत्र लागले होते.

लोकांनी त्यांना त्यामुळे मतदानही केले, पण नंतर शिवाजी महाराजांच्या विश्वासाचे कुठे पानिपत झाले ते समजलेच नाही. शिवाजी महाराजांना फक्त निवडणुकीपुरते वापरून घेतले व सोडून दिले असेच लोकांना वाटते. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे हिंदू मने चाळविण्यासाठी मोदी यांनी शिवरायांच्या नावाने भावनिक साद घातली. हे आता नेहमीचेच झाले आहे.

बंगळुरूत शिवरायांचा अपमान झाला, त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटणे स्वाभाविक आहे, पण महाराष्ट्रातील भाजप पुढारी या विषयावर उसळून उठायचे सोडाच, पण सळसळ करायलाही तयार नाहीत. त्यांनी कागदी निषेधाचे बाण चालवले आहेत. एरवी महाराष्ट्रात असे काही घडले की, राजभवनावर त्यांचे ‘जथेच्या जथे’ पोहोचतात व सरकार बरखास्तीची मागणी करतात. कर्नाटकातील घटनेनंतर हे का होऊ नये? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शे-पाचशे जणांच्या भाजपा शिवप्रेमींनी बंगळुरूत तळ ठोकूनच बसले पाहिजे व राजभवनात वारंवार जाऊन बोम्मई सरकार बरखास्तीची मागणी करत राहिले पाहिजे. तरच ते जातिवंत शिवप्रेमी.

कर्नाटकात वेगळे व महाराष्ट्रात जगावेगळे अशी भाजपवाल्यांची एकंदरीत तऱ्हा दिसते. राज्य आणि देश शिवाजी महाराजांच्या विचारानेच चालवावा. आज हिंदू आणि हिंदुत्ववादावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. भूतकाळातील वैर जिवंत ठेवून वर्तमानकाळात भूतकाळाचा सूड म्हणून अत्याचारी, खुनी राजवट चालविणारे शिवाजीराजे नव्हते.

धर्मपिसाटपणावर त्यांचा विश्वास नव्हता. मात्र धर्मावर, संस्कृतीवर अत्याचाराचे, आक्रमणाचे युग संपले. यापुढे आक्रमण सहन केले जाणार नाही, मोडून काढले जाईल याची जाहीर ग्वाही देणारे शिवाजीराजे होते.

मुसलमानांविषयी शिवाजी महाराजांच्या मनात राग नव्हता. त्यांच्या राज्यात मशिदी व दर्गे सुरक्षित होते. त्यांनी मुसलमानांच्या कत्तली केल्या नाहीत. कोणाला सक्तीने हिंदू करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या सैन्यात व आरमारातही मुसलमान होते. त्यांच्या राज्यात मशिदींची जुनी इनामे चालू होती. खास बाब म्हणून नवी इनामे दिली जात होती. यालाच ‘शिवशाही’ असे संबोधले जाते. राष्ट्रीय पातळीवर त्या शिवशाहीचा लोप झालेला दिसत आहे. शिवाजी महाराज परधर्मसहिष्णू होते. मग कर्नाटकसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात शिवरायांचा अपमान, विटंबना होण्याचे कारण काय?

ग्लोबल न्युज नेटवर्क: