हातातले खंजीर बाजूला ठेवा, मगच बाळासाहेबांच्या स्मारकावर या

शिवसेनेतील बंडांनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आले. तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मूळ शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाल्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा खेळ रंगला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना डावलून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केल्याची टीका शिंदे गट करत आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि इतर ४० बंडखोर आमदारांनी मूळ शिवसेनेशी ‘गद्दारी’ केल्याचा आरोप ठाकरे गट करत आहे. दरम्यान, आज (१६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहेत. त्यावरून संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खोचक सल्ला दिला आहे. “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. मी कुणाचे व्यक्तिगत नाव घेत नाही. काय होते, काय होऊ घातले आहे. हे सगळे बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचे कधी भले झाले नसल्याचा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात; पण चांगल्या मनाने जा.” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज विविध ठिकाणी भेट देणार आहेत. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या राजगृहाला ते भेट देणार आहेत. त्यानंतर राजभवनवरील रोजगार मेळावा आणि नंतर इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा ते घेणार आहेत. संध्याकाळी ५ च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर बंगला परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. तसेच, ७ वाजता बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करणार आहेत.

Team Global News Marathi: