सातारा :- खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) व छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सातारा सत्र न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची म्हणजेच १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा चार दिवस पोलीस कोठडीत मुक्काम राहणार आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना ही कोठडी सुनावली आहे.
खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी २०२० मध्ये सातारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सदावर्ते यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सदावर्ते यांनी संभाजीराजे आणि उदनराजे भोसले यांच्याविरोधात कुणाच्या सांगण्यावरून विधान केले होते, याचा तपास सातारा पोलीस करणार आहेत. आज सकाळी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील अंजुम पठाण यांनी जोरदार युक्तिवाद करत सदावर्ते यांना १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती.
सदावर्ते यांनी कुणाच्या सांगण्यावरून राजघराण्यावर अफझल खानाचे वंशज असल्याचा उल्लेख केला याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे सदावर्ते यांची कोठडी देण्याची मागणी केली होती. तर सदावर्ते यांच्या वकिलांनी पोलिसांच्या नोटिशीच्या त्रुटी दाखवून त्यांना जामीन देण्याची मागणी केली होती. सदावर्ते यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीत तारीखच नाही.
त्यांच्याकडून काहीच हस्तगत करायचे नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्याचा युक्तिवाद सदावर्ते यांचे वकील सचिन थोरात यांनी केला होता. त्यांच्यासोबत सचिन थोरात, सतीश सूर्यवंशी, प्रदीप डोरे या वकिलांनीही सदावर्ते यांची बाजू मांडली. मात्र, कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर दुसरीकडे त्यांच्या जामिनाचा विरोध करत सरकारी वकिलाने जोरदार युक्तिवाद केला. जी काही घटना झाली ती निंदनीय आहे. त्याचा तपास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच आरोपीचं वागणं, शिस्त याची माहिती दिली. त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची गरज आहे. त्यांना कोणी मदत केली का? घटनास्थळी कोण होते? आणि त्यांनी कोणत्या पुस्तकाचा आधार घेऊन ते विधान केले याबाबत तपास करायचा आहे, असे न्यायालयाला सांगण्यात आले.