गुजरातमध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी दिले जातायत वेदांता-फॉक्सकॉनची उदाहरणे

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातेत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला असताना दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आणलेल्या उद्योगांचे मार्केटिंग सुरू केले आहे.भाजपचे प्रचारक, पदाधिकारी व कार्यकर्ते वेदांता-फॉक्सकॉनसह टाटा समूहाच्या एअरबस प्रकल्पामुळे कशी रोजगारनिर्मिती होणार आहे, हे युवकांना पटवून देण्याच्या कामी लागले आहेत.

राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे. राहुल गांधी यांनी राजकोटच्या सभेत बेरोजगारी व बंद पडलेल्या छोट्या उद्योगांवर बोट ठेवत तरुणाईला साद घातली; तर आपनेही भाजपची नेमकी हीच दुखती नस दाबली आहे.

यावेळी माध्यमांच्या प्रातिनिधींनी राजकोटच्या युवकांशी चर्चा केली असता बहुसंख्य युवक बेरोजगारीच्या मुद्द्यावर नाराज असल्याचे दिसून आले.
गेल्या काही वर्षांत शासकीय नोकरभरती झाली नाही. नोकरीसाठी अर्ज मागविले तर परीक्षा झाली नाही. परीक्षा घेतली तर पेपर फुटला. निकाल लागले तर मुलाखती झाल्या नाहीत. ज्यांच्या मुलाखती झाल्या त्यांना नियुक्तिपत्र मिळाले नाही.

तलाठ्यांच्या तीन हजारांवर जागा निघाल्या होत्या. त्यासाठी तीन लाखांवर अर्ज आले होते. यावरून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या किती वाढली आहे, अशी आकडेवारी युवकच मांडत आहेत. सौराष्ट्रच्या भागात गेल्या पाच वर्षांत मोठा उद्योग उभारण्यात आलेला नाही. किमान त्यावर तरी भाजपने लक्ष द्यायला हवे होते, अशी तरुणांची अपेक्षा आहे.

Team Global News Marathi: