पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण

 

जळगाव | रूग्णसेवेच्या बळकटीकरणासाठी या रूग्णवाहिका महत्वाची भूमिका पार पाडतील असा आशावाद व्यक्त करून जिल्ह्यास उर्वरित अँब्युलन्स देखील लवकरच प्राप्त होतील . कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण अनुभवलेच आहेत. या अनुषंगाने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्हा प्रशासनाला आधी १३ अँब्युलन्स प्राप्त झाल्या असून दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. याच्या मदतीने आपण तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज आहोत असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रूग्णालयाच्या आवारात १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ रूग्णवाहिकांचे अलीकडेत लोकार्पण करण्यात आले असून त्या रूग्णवाहिका रूग्णसेवेत रूजू झाल्या होत्या.

यानंतर आज जिल्हा प्रशासनाला दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका प्राप्त झाल्या असून आज जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात याचे लोकार्पण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून आणि अँब्युलन्स चालकांना चावी प्रदान करून याचे लोकार्पण केले. या रूग्णवाहिका जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालयांना वितरीत करण्यात येणार आहेत.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी,प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक नागोजिराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे , डॉ.प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा राणे – पाटील, आतिष सोनवणे, यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.

Team Global News Marathi: