‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला आनंद महिंद्रांकडून भलं मोठं गिफ्ट

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने नीरज चोप्राला त्यांची आगामी XUV700 SUV गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १२१ वर्षानंतर नीरज चोप्राने ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे. महिंद्रा कंपनी आपली फ्लॅगशिप XUV700 SUV गाडी येत्या आठवड्यात लॉन्च करणार आहे. महिंद्रा आपल्या आगामी XUV700 SUV गाडीचा जोरदार प्रचार करत आहे. या वर्षातील सर्वात अपेक्षित गाड्यांपैकी ती एक गाडी आहे.

यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी रिओ ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक आणि पी. व्ही. सिंधू यांना महिंद्रा थार भेट दिली होती. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांनाही उत्तम कामगिरीसाठी थार गाडी भेट दिली होती.

१२१ वर्षांनंतर…

ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: