राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून ठाकरे सरकारला आणखी एक धक्का

 

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यात प्रत्येक बाबींवरुन संघर्ष होताना दिसत आहे. आता राज्यपालांनी ठाकरे शासनाला आणखी एक धक्का दिला आहे. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमधील अग्नीकांडात १४ जणांचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी राज्य शासनाने शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित केले होते.

मात्र डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. १४ जणांच्या बळी गेलेल्या घटनेत राज्यपालांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात आपल्या विशेषाधिकाराचा वापर केल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे. नगरमधील जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये ६ नोव्हेंबर रोजी सकाळी आग लागली होती. त्यात १४ कोरोना रुग्णांचा बळी गेला होता.

या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख व चन्ना आनंद या चौघांना अटक केली.त्यानंतर आरोग्य विभागाने या चौघांसह डॉ. ढाकणे यांनाही निलंबित केले. काही दिवसांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनाही निलंबित करण्यात आले.

तेव्हापासून डॉ. सुनील पोखरणा यांना वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे अर्ज केला होता. सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यांना शिरुर येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. आता राज्यपालांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात वाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे,

Team Global News Marathi: