ठाकरे कुटुंबियांसाठी आनंदाची बातमी…राज ठाकरे आजोबा झाले…

 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा आणि अमित ठाकरे हे बाबा झाले आहेत. ही बातमी ठाकरे कुटूंबावर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि मनसे कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा झाल्याचा आनंद मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे काही वर्षापूर्वी राजकारणात आले आहेत, त्यानंतर अमित ठाकरे बाबा झाल्याची बातमी, राज ठाकरे यांच्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे.

पक्षाचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरून ही गोड बातमी सर्वांना दिली. आमचे साहेब आजोबा झाले, अशी पोस्ट त्यांनी केली. त्याच बरोबर युवराजांचे आगमन असे सांगत त्यांनी राज ठाकरे यांना नातू झाल्याचे म्हटले. सचिन मोरे यांनी अमित ठाकरे यांचे देखील अभिनंदन केले आहे. मंगळवारी सकाळी मिताली ठाकरे यांनी बाळाला जन्म दिला. मुलाचा जन्म झाल्याचे वृत्त कळताच राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे ब्रीज कँन्डी रुग्णालयाकडे रवाना झाले. अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी झाला होता. हा विवाह सोहळा परळ येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये पार पाडला होता. या सोहळ्यास राज्यातील राजकीय नेत्यांसह, चित्रपट आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अमित आणि मिताली यांचा साखरपुडा डिसेंबर २०१८ मध्ये पार पडला होता. मिताली या फॅशन डिझायनल आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून शिक्षण घेतले. राज ठाकरे यांची कन्य उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री असून दोघींनी मिळून काही वर्षांपूर्वी ‘द रॅक’ हा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात, कोणत्या शब्दात आनंद व्यक्त करतात याबद्दल कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. राज ठाकरे आजोबा झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातील मंडळींनी राज ठाकरे आणि मुलाचे बाबा अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे हे आपल्या नातवाचं नाव काय ठेवतात, याबद्दलही काहींना आतापासून उत्सुकता लागल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे.

राज ठाकरे यांनी अनेक दिवसांनी नुकतंच एक भाषण केलं, त्यात त्यांनी मशिदीवरील भोंगे काढा, नाहीतर आम्ही मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू असा इशारा दिला होता, यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु केली आहे, काही ठिकाणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: