पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आज (०२ सप्टेंबर) सकाळी त्यांनी स्वतःच ट्वीट करून या गोष्टीची माहिती जनतेला दिली आहे.
त्यांचा कोरोना असिम्प्टोमेटिक असून त्यांनी त्यांच्या निवासस्थानीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. घरी राहूनच ते मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाही आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे
जनतेने दिल्या भरभरून शुभेच्छा
डॉ. सावंतांनी ट्वीट करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिल्यानंतर काही वेळातच जनतेने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दोन तासापेक्षाही कमी वेळात त्यांच्या या ट्वीटला अडीच हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी त्यांच्या या ट्वीटला उत्तर देत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.