गोवा विधानसभा निकाल:उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

आज पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दरम्यान देशातील सर्वात लहान राज्य गोव्यातील सर्वात महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. अखेर निकाल हाती आला आहे. उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रिकरांना 713 मतांनी पराभूत केले आहे.

या निकालावर प्रतिक्रिया देताना उत्पल पर्रिकर म्हणाले की, ‘अपक्ष उमेदवार म्हणून ही एक चांगली लढत होती, मी मतदारांचे आभार मानतो. लढतीबद्दल समाधानी आहे पण निकाल थोडासा निराशाजनक आहे.’ अशी प्रतिक्रिया दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकरांनी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना दिली आहे.

भारतीय जनता पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये उत्पल यांना तिकीट देण्यात आले नव्हते. भाजपने पणजी येथून बाबुश मोनसेराटे यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र उत्पल पर्रिकरांना पणजीतून भाजपचे तिकीट हवे होते. त्यांना तिकीट न दिल्याने ते नाराज होते. यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: