घराणेशाही परवडली…देशात सध्या हुकूमशाहीचा कहर

 

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. या यात्रेत राहुल गांधी हे लोकांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या धोरणांचा समाचार घेत आहेत. तर दुसरीकडे, भाजपकडून राहुल यांच्या टी शर्टची किंमत सांगून निशाणा साधला जात आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप या लढाईत आता शिवसेनेनंही उडी घेत सामना अग्रलेखातून राहुल गांधी यांचं जोरदार समर्थन केलं आहे.

राहुल गांधी यांनी मांडलेल्या राष्ट्रीय प्रश्नांवर खुलासा करायचे सोडून ते कोणते कपडे घालतात, काय खातात वगैरे पांचट विषय भाजपकडून समोर आणले जात आहेत. म्हणजेच राहुल यांनी विचारलेल्या प्रश्नांत ताकद आहे व भाजपवाल्यांची तोंडे बंद पडली आहेत. लोकांत जागृती करण्याचे काम ही यात्रा करीत आहे व तेच भाजपच्या पोटदुखीचे कारण व आजार आहे. आज देशात स्वातंत्र्य राहिलेले नाही. घराणेशाही परवडली असे वाटावे इतका एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा कहर सुरू आहे,’ असं म्हणत शिवसेनेनं ‘सामना’तून भाजपवर हल्ला चढवला आहे.

भारतीय जनता पक्षाने राहुल यांच्या ‘टी शर्ट’ची किंमत जाहीर केली. मग भारतीय जनता पक्षाचे लोक गांधीजींप्रमाणे फक्त पंचा नेसून उघडे फिरून राजकारण करतात काय? मंत्रिमंडळात रोज चरख्यावर बसून सूत कताई करून त्याची वस्त्र शिवून हे लोक अंग झाकतात काय? की प्रखर हिंदुत्ववादी वगैरे असल्याने ऋषीमुनींप्रमाणे फक्त वल्कले नेसून मंत्रालयात अथवा पक्ष कार्यालयात जातात?’ असा खोचक सवाल शिवसेनेनं विचारला आहे.

Team Global News Marathi: