“गांधी कुटुंबामुळे काँग्रेस कमकुवत होत असेल तर..सोनिया गांधी यांचे मोठे विधान

 

नवी दिल्ली | देशभरातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला होता या पराभवावर दीर्घ चिंतन करण्यात आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत अनेकविध विषयांवर मंथन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी गांधी कुटुंबीयांमुळे काँग्रेस कमकुवत होत असेल तर आम्ही त्याग करायला तयार आहोत, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या सुमारे साडे चार तास चाललेल्या बैठकीत कार्यकारिणीच्या सदस्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. पक्ष मजबुतीसाठी नव्याने काम करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. नवीन अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या दिशेने पक्ष तयारी करणार आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी पक्षाचे चिंतन शिबिर आयोजित केले जाणार आहे. याच महिन्यात कार्यकारिणीच्या सदस्यांची आणखी एक बैठक होणार असून त्यात पुन्हा एकदा निवडणुकीतील पराभवाची चिकित्सा केली जाणार आहे. काँग्रेस आाणि भाजपदरम्यान विचारधारेचा लढा आहे. हा लढा जिंकण्यासाठी कठोर मेहनत आणि वेळ लागतो. तेव्हा हताश होण्याची गरज नाही, असे मत काँग्रेस कार्यकारिणीतील काही सदस्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.

Team Global News Marathi: