मंदिरं खुली करण्यावरुन पवारांचं मोदींना पत्र, राज्यपालांबद्दल केली पवारांनी तक्रार, वाचा पवारांच्या पत्रात नेमकं काय?

‘मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यपालांना स्वत:ची व्यक्तिगत मतं असू शकतात, शिवाय ती मतं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायलाही कुणाची हरकत नाही. पण त्यासाठी वापरलेली भाषा धक्कादायक आहे. शिवाय हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्याबद्दलही पवारांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

राज्यपालांनी मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त करत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. अनलॉकबाबत केंद्राने दिलेल्या सुचनांचं राज्य सरकार पालन करत असताना राज्यपालांची घेतलेली भूमिका धक्कादायक असल्याचं पवारांनी या पत्रात नमूद केलंय.

राज्यात शिर्डी, सिद्धिविनायक मंदिर आणि विठ्ठल मंदिरांसारखी मोठी मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये एरव्हीही मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोनाची सद्यस्थिती पाहता ही मंदिरं खुली करणं संयुक्तिक होणार नसल्याचं पवारांनी या पत्रात नमूद केलंय. त्यामुळे धार्मिक स्थळं उघडली नाहीत म्हणून ‘सेक्युलर’ ठरवण्याच्या या प्रकाराला काय म्हणायचं? असा सवालच शरद पवार यांनी या पत्रात विचारलाय.

राज्यात सिध्दीविनायक, पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदीरांसह अनेक मंदीरे व प्रार्थनास्थळे आहेत, ते सुरु करण्याची परवानगी दिल्यास लोकांमध्ये सुरक्षित अंतर राखणे अशक्य होईल, त्या पार्श्वभूमीवरच राज्यातील धार्मिक स्थळे सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शविला आहे, याचाही उल्लेख पवार यांनी मोदींना लिहीलेल्या पत्रात आवर्जून केला आहे.

आपण हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहात, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला भेट देऊन प्रभू श्रीरामांविषयीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची महापूजाही केली आहे, आता मंदीरे सुरु करताना तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झाला आहात काय, असा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करणे धक्कादायक असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. राज्यपालांची ही भाषा आपणही नक्की नोंद घ्याल, एखाद्या राजकीय व्यक्तीने लिहील्यासारखे हे पत्र राज्यपालांनी लिहीले आहे. धर्मनिरपेक्ष या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेमध्ये अनन्यसाधारण महत्व असताना राज्यपालांनी पत्रात त्याचा उल्लेख अशा रितीने करण्यावर पवार यांनी आक्षेप घेतला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांसारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला पत्र लिहीतांना शब्द व भाषेचा योग्य वापर करणे अपेक्षित असते, असेही पवार यांनी नमूद केले आहे.

राज्यपालांच्या पत्राचा रोख विचारात घेता आता मुख्यमंत्र्यांनाही माध्यमे व समाजापुढेही आपली भूमिका मांडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि या मुद्यावर मी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचेही पवार म्हणतात. हा मुद्दा मी ना राज्यपालांशी चर्चा केला आहे ना मुख्यमंत्र्यांशी. पण माझ्या मनातील व्यथा आपल्यापर्यंत व समाजापर्यंत पोहोचावी असे मला वाटले असेही शेवटी पवार यांनी या पत्रात नमूद केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: