भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचं निधन | कोरोनाची लागणही झाली होती
नवी दिल्ली, १७ ऑगस्ट : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचं निधन रविवारी निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागणीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी चेतन चौहान यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
जुलै महिन्यात त्यांना कोरोना झाला होता. चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.
चेतन चौहान यांनी 1991 मध्ये अमरोहा येथे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि तेथून खासदार म्हणून निवडून गेले. यानंतर पुन्हा एकदा 1996 मध्ये भाजपने त्यांना या मैदानात निवडणुकीच्या लढाईसाठी उभे केले, परंतु यावेळी त्यांचा पराभव झाला.
1998 मध्ये चेतन चौहान पुन्हा खासदार म्हणून निवडून गेले. त्याचवेळी त्यांनी 1999 आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकीतही नशीब आजमावले, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या ते अमरोहा जिल्ह्यातील नौगावा विधानसभेचे आमदार होते.