या कारणासाठी १ जानेवारीला राहणार पुणे-नगर महामार्ग बंद
ग्लोबल न्यूज; कोरोनाच्या नव्या रुपातील विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. संबंधित विषाणूबद्दल खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. अशात १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतता, त्याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आहे.
दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगावला लाखो अनुयायी एकत्र येतात. पण यंदा कोरोनाचे संकट असल्याने लोकांनी घरातूनच अभिवादन करावे, असं आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानंतर आता १ जानेवारीला पुणे – नगर महामार्ग बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या महामार्गावरिल वाहतूक ३१ डिसेंबर २०२०ला सांयकाळी पाच पासून ते एक जानेवारी २०२१ ला रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे १ जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.