शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महासंग्राम मेळावा

 

बुलडाणा | एकीकडे ‘एफआरपी’चे दोन तुकडे केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने सुरु आहेत. ठिकठिकाणी शासन निर्णयाची होळी केली जात आहे.तर दुसरीकडे बुलडाणा येथे शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला पीकविमा आणि घरकुल मिळावे या मागणीसाठी महासंग्राम मेळावा पार पडला आहे.

सरकारकडून योजनांच्या घोषणा तर होतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदवला पण प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम ही अदा झालेली नाही. आंदोलन आणि मोर्चे काढल्याशिवाय याची नोंद घेतली जात नाही म्हणूनच बुलडाणा जिल्ह्यातील पातूरडा येथे शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर यांच्या नेतृत्वामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर विमा कंपन्यांची मनमानी होत असल्याने अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचित राहत आहेत. यामुळे राज्यासाठी स्वतंत्र विमा योजना राबवण्याची मागणी शेतकरी संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. पीकविम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या हक्काचे असून ते मिळवून देण्यासाठीच या महासंग्राम मेळाव्याचे आयोजन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: