चिपळूणसह अनेक भागांत पुराचं संकट, पंतप्रधान मोदी यांचा मुख्यमंत्र्यांना फोन !

मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील चिपळूणची स्थिती सर्वाधिक बिकट आहे. चिपळूणमधील बाजारपेठा आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे हजारो लोकांचा जीव टांगणीला आहे. पुण्यातून निघालेल्या एनडीआरएफच्या टीम अद्याप चिपळूणला पोहोचलेल्या नाहीत. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

 

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थिती याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीचा सामना करताना केंद्राकडून शक्य तितकी सर्व मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं. प्रत्येक जण सुरक्षित राहावा यासाठी प्रार्थना करत आहे,’ असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोकण पट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं अडचणीत भर पडली आहे. चिपळूणची स्थिती सर्वात बिकट आहे. गेल्या अनेक तासांपासून चिपळूण पाण्याखाली आहे. शेकडो घरांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतीला खूप मोठा फटका बसला आहे. नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच एनडीआरएफची टीम अद्याप दूर असल्यानं मदतकार्य वेगानं सुरू होऊ शकलेलं नाही. दुसरीकडे थोड्याच वेळात समुद्राला भरती येणार असल्यानं चिपळूणमधील पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागणार आहे.

 

Team Global News Marathi: