आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला पोलिसांनी घातल्या बेड्या

 

पुणे | गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सिरियल्स बघून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आजवर समोर आली आहेत. मात्र गुन्हे करून त्याचा उपयोग कथा लेखनासाठी करण्याचा प्रकार पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या लेखकाने केलेले गुन्हेही साधेसुधे नसून गेल्या दहा वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी नातं जोडून देतो असं सांगत बड्या बड्यांना फसवत असल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील एका ७६ वर्षांच्या व्यवसायिकाला तब्बल साठ लाखांचा गंडा या लेखकाने घातल्यावर सायबर पोलिसांनी या कथित लेखकाला अटक केली आहे. मात्र आता या सगळ्याची देखील एक कथा बनेल असं हा लेखक पोलिसांना सांगतोय. अनुप मनोरेची दोन अतिशय भिन्न रूपं आहेत. अनुप पहिल्या रूपात तो मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिखाण करणारा एक लेखक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांसोबत त्याची उठबस आहे. हिंदी रंगभूमीवर त्यानं शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित रंग रसिया बालम या नाटकात काम केलंय.

एका यशस्वी कलाकाराचं चकचकीत आयुष्य तो जगत आला होता. मात्र याच अनुप मनोरेचं दुसरं रूप तेवढंच विदारक आहे. कारण गेल्या दहा वर्षांपासून हाय प्रोफाइल महिलांशी शरीर संबंध प्रस्थापित करून देतो असं सांगत तो हजारो लोकांना फसवत आलाय. त्यासाठी त्याने गणेश शेलार हे खोटं नाव धारण केलं होतं. फसवणुकीसाठी त्यानं निवडलेला मार्ग देखील शेरलॉक होम्स किंवा व्योमकेश बक्षीच्या कथेला साजेसा असाच आहे. ‘एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा’, ‘मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब’, ‘रोड टू हेवन’ अशा शीर्षकांसह तो वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत असे आणि बडे मासे आपल्या जाळ्यात ओढत असे.

Team Global News Marathi: