तांडव वेब सीरिज विरोधात मुंबईत FIR दाखल, एफआयआरमध्ये सैफ अली खानचंही नाव
मुंबई : अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime)वरील ‘तांडव’ वेब सीरिज (Tandav Web Series) रिलीज झाली आणि त्यानंतर नवा वाद उभा सुरू झाला. या वेब सीरिजमधील संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेण्यात आले. यावर नाराजी व्यक्त करत तांडव वेब सीरिजवर बंदीची मागणीही करण्यात आली आहे. देशभरातून या वेब सीरिज विरोधात निषेध आणि तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर आता मुंबईतील (Mumbai) घाटकोपर पोलीस ठाण्यात (Ghatkopar Police Station) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी उत्तरप्रदेशातील पोलिसांनीही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार ठिकाणी एफआयआर दाखल केला आहे.
मुंबईतील घाटकोपर पोलिसांत भाजप आमदार राम कदम यांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये तांडव वेब सीरिजमधील मुख्य अभिनेता सैफ अली खान याच्या नावाचाही समावेश आहे. तर उत्तरप्रदेशात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये अॅमेझॉनच्या अपर्णा पूरोहित, दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु आणि लेखक गौरव सोलंकी यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकूणच तांडव वेब सीरिजला होणारा विरोध, त्यानंतर निर्माण झालेला वाद आणि आता दाखल झालेला एफआयआर यामुळे निर्मात्यांच्या अडचणी आणखीनच वाढताना दिसत आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याच्या तक्रारीची दखल घेतली होती आणि यावरुन अॅमेझॉन प्राईम व्हिडिओकडून स्पष्टीकरण मागितले होते. वेब सीरिजच्या पहिल्या भागात हिंदू देव-देवीबाबत चुकीची माहिती दाखवण्यात आली आहे आणि त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह भाषेचाही वापर केला असून त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेली ही वेब सीरिज गौरव सोलंकी यांनी लिहिली आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान, डिंपल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, सुनील ग्रोव्हर सारखे सेलिब्रिटी आहेत. या वेब सीरिजमध्ये निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि इतरांवर उत्तरप्रदेश पोलीस, वकिलांची प्रतिमा डागाळणे, समाजातील विविध घटकांमध्ये द्वेष पसरवणे, जातीवादाची टिंगल करणे, देवी-देवतांचा अपमान करणे या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.