अखेर फायनल: विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीने राज्यपालांकडे सुपूर्द केली बारा जणांची नावे

विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे बंद पाकिटात सुपूर्द केली आहेत. राज्यपाल ठाकरे सरकारच्या नावांना मंजुरी देणार की, आडकाठी करणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर लक्ष असेल. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही यादी राज्यपालांकडे दिली आहे.

यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी व न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरुन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सर्व निकषात ही नावं बसावीत, अन्यथा पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. तर शिवसेनेने देखील आपली चार नावे निश्चित केली आहेत. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि धनगर समाजाचे नेते साहित्यिक यशपाल भिंगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून रजनीताई पाटील, सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन, आणि गायक अनिरुद्ध वनकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर ,आजी आमदार सुनील शिंदे ,आदेश बांदेकर ,माजी मंत्री सचिन अहिर
माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील , युवा सेनेचे वरुण सरदेसाई आणि राहुल राहुल कनाल यापैकी चार नावे असल्याचे अधिकृत वृत्त आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: