अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे.

सचिन वझे प्रकरणावरून  राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले असून कोणाचीतरी विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) हटविण्याची मागणी जोर धरत होती. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती. या साऱ्या पार्शभूमीवर काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत हायव्होल्टेज बैठकी सुरु होत्या. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे.

ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्वीटवरून मिळत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे.  महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सरकारचा मोठा निर्णय- नव्या बदल्या

हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त

रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार

संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी

परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जवाबदारी

पवारांचा परम बीर सिंहांना हटवण्याचा आग्रह

दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात  परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असल्याचं बोललं जातं.

कोण आहेत परम बीर सिंह?

• परम बीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
• त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागात अनेक पदांवर काम केलं.
• लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक पद सांभाळलं.
• ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते.
• परम बीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

हेमंत नगराळे यांची कारकीर्द

हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: