चुकीचे गंभीर आरोप केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ

 

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूवर संशय उपस्थित करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. राणेंनी केलेल्या आरोपांची तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे केली.त्याची दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. याबद्दलचा अहवाल ४८ तासांत सादर करण्याचे आदेश चाकणकर यांनी दिला आहे. दिशा सालियनच्या बदनामी प्रकरणी राणेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे.

मात्र दुसरीकडे फक्त सुडाचे राजकारण करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे, अशी माहिती चाकणकरांनी ट्विट करून दिली आहे.

Team Global News Marathi: