खळबळजनक!! अंबानींच्या घरासमोर सापडली स्फोटके भरलेली बेवारस स्कॉर्पिओ

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील बंगल्याबाहेर गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या गाडीत तब्बल 20 हून अधिक जिलेटिनच्या कांडय़ा आणि धमकीचे पत्र सापडले. घातपाताच्या उद्देशाने ही गाडी या ठिकाणी ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेचा सर्व तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून केला जात असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील अँटिलिया या बंगल्याच्या हाकेच्या अंतरावर एक स्कॉर्पिओ गाडी बुधवारी मध्यरात्री पार्क करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गुरुवारी दुपारी वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासानंतर मुंबई पोलिसांनी बॉम्बशोधक पथक आणि इतर यंत्रणेला पाचारण केले. त्यानंतर पोलीस तपासानंतर या गाडीत 20 हून अधिक जिलेटीनच्या कांडय़ा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडी घातपात करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटीलही घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

धमकीचे पत्रही आढळले

मुंबई पोलिसांना या गाडीत स्फोटकांसोबत धमकीचे पत्रदेखील आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या पत्रात नेमका मजकूर काय आहे याची सविस्तर माहिती मिळालेली नाही. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीदेखील अंबानींना धमकीचे पत्र आले होते.

व्हीआयपी परिसर

ज्या ठिकाणी ही गाडी पार्किंग करण्यात आली होती त्यापासून हाकेच्याच अंतरावर मुकेश अंबानी यांचा अँटिलिया हा बंगला आहे. त्यानंतर पुढे अनेक उद्योजक आणि मंत्र्यांचे बंगले आहेत. त्यामुळे या घटनेनंतर या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाहनाची नंबर प्लेट बनावट

स्कॉर्पिओची नंबर प्लेट बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या गाडीत आणखीन काही नंबर प्लेट मिळाल्या आणि त्या अंबानींच्या ताफ्यातील गाडय़ांच्या नंबरशी मिळत्या जुळत्या आहेत, असे सांगण्यात आले.

गुरुवारी पहाटे गाडी पार्क केली

या परिसरातील शिखरकुंज या इमारतीतील विजय स्टोअर्स या दुकानासमोर गुरुवारी पहाटे 1 वाजता ही स्कॉर्पिओ चालकाने पार्क केली. या गाडीमागे आणखी एक इनोव्हा होती. ती तेथून निघून गेली.

लवकरच सत्य समोर येईल

‘मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या 20 कांडय़ा सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई क्राइम ब्रँच करत आहे. लवकरच सत्य माहिती समोर येईल.’

अनिल देशमुख, गृहमंत्री

हे नेमकं कुणी केलंय? ते शोधून काढू

‘मी मुंबई पोलीस आयुक्तांच्या सतत संपर्कात आहे. ती गाडी आम्ही ताब्यात घेतलेली आहे. गाडीच्या नंबर प्लेटवरील नंबर जरी काढला असला तरी त्याच्या खोलवर जाऊन आम्ही तिथे गाडी सोडणाऱयाला शोधून काढू. हे नेमकं कुणी केलंय? याच्या मुळाशी कोण आहे? ते निश्चितपणे शोधून काढू. स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास दिलेला आहे. या एका प्रकरणामुळे कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही.’

शंभुराज देसाई – गृह राज्यमंत्री

ग्लोबल न्युज नेटवर्क: