मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांचं जोरदार उत्तर, म्हणाले ‘याचा अर्थ काय?’

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला नवीन वळण लागणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

‘कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने (Shivsena) जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत, आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही’ असं सागंत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा भावनिक आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आवाहनाला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे, एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबां च्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी #donttrickmaharashtra असा हॅशटॅगही वापरला आहे.

एकनाथ शिंदे मुंबईत येणार

दरम्यान, एकनाथ शिंदे लवकरच मुंबईत येणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्वतःच ही माहिती दिलीय.. आज बऱ्याच दिवसांनी एकनाथ शिंदे गुवाहटीत हॉटेलबाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी गेटच्या आतमधूनच संवाद साधला. काळजी करु नका, लवकरच मुंबईत येऊ, असं शिंदेंनी सांगितलं.

गुवाहाटीत सगळे आमदार आनंदात आहेत. सगळे 50 आमदार स्वतःच्या मर्जीनं आलेत, कुठल्याही आमदारांवर येण्याची जबरदस्ती केली नव्हती असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.

ग्लोबल न्युज नेटवर्क: