“एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागली, पण मी भाजपला इशारा देतोय…”;

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आता एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. राज्यातील अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी वर्गाला निर्देशही दिले आहेत. मात्र, यातच आता शिवसेनेकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची तात्पुरती हौस भागली आहे. मात्र, यामागे भाजप असून, शिवसेना संपवण्याचा डाव यशस्वी होणार नसल्याचा स्पष्ट इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती.

हा भाजपचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे काही कायम स्वरूपी नाही. फक्त एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले इतर ३९ आमदार गेल्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे जरी नुकसान झाले असले, तरी शिवसेनेचा मूळ ढाचा कुठेही ढासळलेला नाही, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच जे लोक मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेले होते, त्यांचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाटक सुरू झाले. ५-६ महिन्यांपूर्वीपासून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत होते. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे असेल, तर मी खाली उतरतो असे त्यांना सांगितले होते. एकनाथ शिंदेंशी वारंवार सविस्तर चर्चा झाली होती. पक्षात फूट पाडण्याचे काम करू नका असे त्यांना सांगितलं होते.

Team Global News Marathi: