‘एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक, फसवणूक करुन आमदारांना घेऊन गेले’

 

विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे तसेच त्यांनी आपल्या काही मागण्या पक्षप्रमुखांपुढे ठेवल्या आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले की, “काही आमदारांची नावे मीडियात आली, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले. यात काही मंत्र्यांची नावेही होती. पण, ते सर्व वर्षावर आहेत. काही आमदारांशी संपर्क झाल्यावर समजले की, त्यांना या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. त्यातील काही परत मुंबईकडे येत आहेत.

तसेच काही सध्या सूरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील करत आहेत. त्या आमदारांना तिकडेच का ठेवलं? यातून त्यांचे षडयंत्र दिसून येत आहे. फसवणूक करुन आमदारांना घेऊन गेले. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर आम्ही तुम्हाला अधिक माहिती देऊ,” असंही ते म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते. सेनेचे उमेदवार विजयी व्हावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते. ते आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत, कडवत शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत जे बोलले जात आहे, ते चुकीचं आहे.

पुढे बोलताना ते म्हणले की, जोपर्यंत त्यांच्याशी बोलणं होत नाही, तोपर्यंत मी यावर काही बोलणार नाही. मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. पण, तरीदेखील काही गैरसमज झाले असतील, तर ते दूर होतील. आमचे सर्व सहकारी यावर बोलत आहोत, सर्वांशी चर्चा सुरू आहे. राजकारणात अशा प्रसंगांना सामोरे जावं लागतं.

 

Team Global News Marathi: