एकनाथ खडसेंना लवकरच विधानपरिषदेची लॉटरी ? लवकरच नाव जाहीर होण्याची शक्यता !

 

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शीतयुद्ध पेटलेले असताना विधान परिषद निवडणूक प्रक्रियेलाही वेग आला आहे. राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

विधान परिषद उमेदवारीवर चर्चा करण्याकरिता काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला उतरवायचं, यावर चर्चा झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात एकनाथ खडसे यांचं नाव प्राधान्यानं पुढे आलं असून लवकरच नाथाभाऊंच्या नावाची घोषणा केली जाईल. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या नाथाभाऊंना गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा होती. विधानपरिषद उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली तर ही त्यांच्यासाठी मोठी संधी समजली जात आहे.

महाराष्ट्रात एकिकडे बऱ्याच वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होत आहे. तर विधानपरिषदेची निवडणूक देखील 20 जून रोजी होणार आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9जून आहे. त्यामुळे अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आवश्यकता आहे.

Team Global News Marathi: