ईडीची कारवाई राजकीय सूडबुद्धीने, सतीश उकेंचा न्यायालयात दावा, ६ एप्रिलपर्यंत ईडीची कोठडी

माझ्याविरोधात ईडीने केलेली कारवाई सूडबुद्धीने केली असून अटक करताना कायद्याचे पालन केलेले नाही असा युक्तिवाद सतीश उके यांच्या वतीने आज सत्र न्यायालयात करण्यात आला. दरम्यान सतीश उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उके यांना विशेष पीएमएलए कोर्टाने ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका दाखल केल्याने मनी लॉण्डरिगच्या आरोपाअंतर्गत अॅड. सतीश उके यांच्या नागपूर येथील घरी गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास धाड टाकत ईडीने कारवाई केली. १२ तासांच्या चौकशीनंतर उके यांना ईडीने अटक केली. रिमांडसाठी अॅड. सतीश उके यांना आज ईडीने सत्र न्यायालयात सादर केले. त्यावर न्यायाधीश गिरीश गुरव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

ईडीच्या वतीने अॅड. हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, उके यांच्यावर बेकायदा पद्धतीने आणखी एक जमीन बळकावल्याप्रकरणी न्यायालयात खटला प्रलंबित आहे. तसेच त्यांच्याविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल असून या आरोपांची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांची कस्टडी मिळणे आवश्यक आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आली तसेच न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी आपल्याला धमकावण्यात आले असून आपल्याविरोधात षड्यंत्र रचले जात असल्याचा युक्तिवाद अॅड उके यांनी केला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत सतीश व त्यांचा भाऊ प्रदीप उके या दोघांना ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

उके यांच्या लॅपटॉपमध्ये फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस, न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण, निमगडे खून प्रकरणाचे पुरावे होते. ते पुरावे नष्ट करण्यासाठीच हा छापा घातला गेला व लॅपटॉप जप्त केल्याचा आरोप प्रदीप उके यांनी केला.

Team Global News Marathi: