“ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, इतरांचं काय? थेट सामनातून राष्ट्रवादीला सवाल

 

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातून ईडीची कारवाई आणि त्याविरोधात होणाऱ्या आंदोलनांवर भाष्य करण्यात आलंय. ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरते मग इतर पक्ष का आंदोलनं करत नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षांना विचारण्यात आला आहे.

“लोकशाहीत निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळे झेंडे, काळा इतिहास ही प्रतिके आहेत. दक्षिणेतील देवांना तर काळ्या कपडय़ांचाच सोस आहे. भाजपनेही अनेक आंदोलनांत काळे कपडे, काळे झेंडे यांचा मुक्त वापर केला आहे. महागाई, बेरोजगारी व ‘ईडी’चा दहशतवाद हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा अध्याय आहे. काँगेसची ताकद क्षीण आहे, पण दिल्लीत सरकारी दहशतीची पर्वा न करता गांधी कुटुंब रस्त्यावर उतरले हे लक्षात घ्यायला हवे. इतर विरोधकांसाठी हा धडा आहे. कोणी खरंच भयमुक्त असेल तर हा धडा घ्यावा!”, असं सामनात म्हणण्यात आल आहे.

सामनातून मित्रपक्षांना सवाल
महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन करणारा एकमेव पक्ष म्हणून कॉंग्रेसकडेच बोट दाखवावे लागेल. महागाईबरोबरच काँग्रसने ‘ईडी’च्या विरोधातही जोरदार एल्गार केला. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह असंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. संसदेत व संसदेबाहेर י’ त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली. प्रियंका गांधी यांना तर पोलीस फरफटत ओढत घेऊन जात आहेत, हे चित्र देशाने पाहिले.

महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे. रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. महागाई, बेरोजगारी हे विषय गंभीर आहेत, पण त्यावर बोलणाऱ्यांना देशद्रोही अथवा धर्मद्रोही ठरवले जाते.

Team Global News Marathi: