“दुर्योधन आणि दु:शासनाने केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सरकार अस्तित्वात” – सचिन सावंत

 

मुंबई | आघाडी सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. मात्र, राजभवनावर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिंदे यांच्या गटाला भाजपा पाठिंबा देईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले.

याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडल्या. अखेरीस राजभवनावरील छोटेखानी समारंभात शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता काँग्रेसने नव्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुर्योधन आणि दु:शासन असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच “अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले” असं देखील म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “‘दुर्योधन’ म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व ‘दु:शासन’ म्हणजेच मोदी सरकारच्या अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा” असं म्हणत सचिन सावंत यांनी सत्ताधाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.

Team Global News Marathi: