शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांच्या गाडीवर हल्ला

 

केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्ल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून केंद्राच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तसेच या आंदोलनाला अनेकदा वेगळे स्वरूप सुद्धा प्राप्त झाले होते. त्यातच लखीमपूर येथे घडलेल्या घटनेनंतर शेतकरी अधिकच संतापले होते. त्यातच हरयाणात शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. तर आपल्याला जिवे मारण्याचा कट होता असा अरोप खासदार जांगडा यांनी केला.

समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी खासदार रामचंद्र जांगडा एका धर्मशाळेच्या भूमीपुजनासाठी हिस्सार जिल्ह्यात आले होते. तेव्हा काही शेतकर्‍यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांचा रस्त अडवला. तेव्हा त्यांच्या गाडीवर काही जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जांगडा यांच्या गाडीची काच फुटली. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही.

अखेर पोलिसांनी सुरक्षितरित्या जांगडा यांना घटनस्थळाहून बाहेर काढले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार रामचंद्र जांगडा यांनी शेतकरी आंदोलनविरोधी वक्तव्य केले होते. त्यावर जांगडा यांनी माफी मागावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती मात्र त्यांनी माफी न मागितल्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळून सदर प्रकार घडला होता.

Team Global News Marathi: