मुंबईच्या वाट्याला जाऊ नका’ एकनाथ गायकवाड यांचा मोदी सरकारला इशारा

मुंबईच्या वाट्याला जाऊ नका’ एकनाथ गायकवाड यांचा मोदी सरकारला इशारा

मुंबई : ‘मुंबईतले उद्योगधंदे, संस्था गुजरात राज्यात नेले जात आहेत. पण आम्ही मुंबईचे महत्व कमी होऊ देणार नाही. मोदी सरकारचा हेतू यशस्वी होऊ देणार नाही. मुंबई आमची आहे, मुंबईच्या वाट्याला जाऊ नका,’ असा खणखणीत इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी आज येथे दिला. तसेच मोदी सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधातील काळ्या कायद्यांविरोधात त्यांनी कडाडून टीका केली.

मुंबई काँग्रेसतर्फे चेंबूर येथे आज “स्वाक्षरी अभियान” राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुंबई कॉंग्रेसचे पदाधिकारी राजेश ठक्कर, शिवकुमार लाड, जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता, तालुकाध्यक्ष निलेश नानचे उपस्थित होते. यावेळी निलेश नानचे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनही एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते झाले. ‘मोदी सरकार हे झोलझाल सरकार आहे. त्यांनी जे जे निर्णय घेतले ते फक्त आणि फक्त उद्योगपतींच्या फायद्याचेच आहेत. त्यांच्या नव्या कायद्यांमुळे शेतकरी आणि कामगार वर्ग उध्वस्त होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या हातात दिली आहे. त्यामुळे देशात हाहाकार माजेल. लुटालूट सुरु होईल. म्हणूनच काँग्रेसने त्याविरुद्ध स्वाक्षरी अभियान छेडले आहे. लाखों सह्याचे निवेदन मोदी सरकारला पाठवू आणि हे काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडू,’ अशी घणाघाती टीका एकनाथ गायकवाड यांनी केली.

यावेळी मोदी सरकारने कामगार व शेतकरी संदर्भात केलेल्या कायदे कसे विघातक आहेत, याबाबत नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली. तसेच काळ्या कायद्यांविरोधी निवेदनावर सही करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानुसार शेकडो नागरिकांनी त्यांच्या समक्ष सह्या केल्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: