बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीविरोधात रघुनाथ कुचिक यांची सायबर पोलिसांकडे धाव

पुणे | पुण्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीविरोधात सायबर पोलिसात धाव घेतली आहे. संबंधित तरुणीकडून आपली बदनामी सुरु असल्याची तक्रार त्यांनी काल पुणे सायबर पोलिसात नोंदवली. राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा डाव विरोधकांकडून करण्यात येत असून याच उद्देशाने बदनाम करण्याचा कट रचण्यात आल्याचे कुचिक यांनी यापूर्वी माध्यमांना सांगितले आहे.

तरुणीच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेला नंबर एडिट करुन माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. 12 मार्च 2022 रोजी तरुणीने फेसबुक पोस्ट करत रघुनाथ कुचिक आपल्याला व्हॉट्सअॅपवर धमकावत असल्याचा आरोप केला होता. याचे स्क्रीनशॉटही तिने शेअर केले होते. तसंच आपण आत्महत्या करत असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं. आता ती मुलगी बेपत्ता झाली आहे.

तर दुसरीकडे रघुनाथ कुचिक यांनीच तिला गायब केल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. त्यामुळे रघुनाथ कुचिक यांच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तर तरुणीच्या याच फेसबुक पोस्टनंतर रघुनाथ कुचिक यांनी पुणे सायबर पोलिसात तक्रार केली. “तरुणीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये माझा नंबर दर्शवत आहे. परंतु हे तिने स्वत: एडिट करुन माझी बदनामी करत आहे. माझी सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असं रघुनाथ कुचिक यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Team Global News Marathi: