आळंदीसह आसपासच्या गावांत उद्यापासून संचारबंदी ;जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

आळंदी : आषाढी, कार्तिकी वारीनंतर आता तिर्थक्षेत्र आंळदी येथे दरवर्षी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीसह आसपासच्या अकरा गावांत उद्यापासून दि. ६ ते १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंश देशमुख यांनी दिला.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) पासून भरणार आहे. कार्तिकी वद्य एकादशी (११ डिसेंबर) ला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी (ता. १३ डिसेंबर) ला आहे. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं संकट निर्माण झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंळदी शहरासह आजुबाजुच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

त्यात आळंदी, चऱ्होळी खुर्द, केळगाव, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ आणि पिंपरी महापालिका हद्दीतील चऱ्होळी बु. डुडूळगाव या गावामधे अत्यावश्य सेवा वगळता इतरांना संचारबंदी आहे. संचारबंदी काळात हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळेत रहिवास करण्यास पूर्ण बंदी आहे.

आळंदीसह मंदिर परिसरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.  अगोदर जे निवास करून आहेत त्यांना आळंदीबाहेर जाण्यास सांगितले. आळंदीला येणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी असून प्रवाशी वाहतूक बंद राहिल. तर मरकळ, शिक्रापूर चाकणकडे जाणारी औद्योगिक वाहने आळंदीतून न येता चऱ्होली आळंदी बायपास आणि पुणे नगर महामार्गावरून वळविण्यात येतील. कामगार वर्गाने नियुक्तीचे ओळखपत्र,आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे.

फक्त 20 वारकऱ्यांना परवानगी

कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या काळात वारकऱ्यांचा आळंदीत मुक्काम असतो. ही परंपरा कायम ठेवत पंढरपूरातून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या श्री. पांडुरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या तीन दिंड्यांना राज्य शासनानं परवानगी दिली आहे. तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी वीस लोकांना आळंदीत येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तीन दिंड्यांसाठी स्वतंत्र एसटी बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: