काँग्रेसवर अवलंबून राहण्यात आता काहीच अर्थ नाही” – ममता बॅनर्जी

 

कोलकाता | देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांत प्रचंड मोठे यश मिळून सत्ता राखली आहे. यानंतर काँग्रेसवर चौफेर टीका होत असून, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपविरोधात लढा देण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे.

काँग्रेसवर अवलंबून राहण्यात आता अर्थ नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनीही मीडियाशी संवाद साधताना आपली मते व्यक्त केली आहेत. काँग्रेस आता सगळीकडे पराभूत होत चालली आहे. काँग्रेसला आता जिंकण्यात काही स्वारस्य राहिलेले आहे, असे दिसत नाही. काँग्रेसची विश्वासार्हता संपत चालली आहे आणि आता त्यांच्यावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आधी जिंकत असे, कारण काँग्रेस पक्षाचे संघटन चांगले होते, असे सांगत भाजपविरोधी गटामध्ये काँग्रेसला एकत्र ठेवण्यात अर्थ नाही. कारण ती गोष्ट आता काँग्रेसमध्ये राहिली नाही, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला. अनेक मजबूत प्रादेशिक पक्ष आहेत आणि ते एकत्र आले तर अधिक प्रभावी होतील. आता काय करायचे आहे हे काँग्रेसने ठरवायचे आहे. पण भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे मला वाटते. काँग्रेसची वाट पाहण्यात अर्थ नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Team Global News Marathi: