मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवा | ठाकरे सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवा | ठाकरे सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज

मुंबई, २१ सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारवर टीका झाली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं आश्वासन दिलं. तसंच मराठा बांधवांच्या मागण्यांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत असंही म्हटलं होतं. त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला धक्का बसला. आता या प्रकरणात कायदेशीर लढाई देण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. एक ते दोन दिवसांत राज्य सरकार मराठा आरक्षण प्रकरणात योग्य पाऊल उचलेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आज सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे विनंती अर्ज दाखल केला. आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

तत्पूर्वी स्थगितीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या बुधवारी बैठक घेतली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समाधानही व्यक्त केलं. दरम्यान आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: