दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा सोहळा नाकारणे म्हणजे चुकीचा पायंडा पाडण्याचे षडयंत्र – ॲड.धर्मपाल मेश्राम

 

नागपूर | १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहरातील दीक्षाभूमी येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यानंतर दरवर्षी न चुकता दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित करण्यात येत होता. यामध्ये दरवर्षी लाखो बांधव बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायचे. मात्र यावर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दीक्षाभूमीमध्ये प्रवेशाला परवानगी देत धम्मदीक्षा सोहळा नाकारला.

 

परिणामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष पूज्य भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी नाईलाजाने धम्मदीक्षा सोहळा बेझनबाग येथे हलविला. या सोहळ्याचे उद्घाटन राज्य सरकारमधील ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. एकूणच सरकारची ही कृती निषेधार्य असून धम्मदीक्षेबाबत चुकीचा पायंडा पाडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.

ते म्हणाले, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती नागपुरात घडविली. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर दरवर्षी दीक्षाभूमीवर लाखो बांधव बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. या कार्यात कधीही खंड पडला नाही. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यावर्षी धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशाला परवानगी दिली. दीक्षाभूमीमध्येही स्तूपाच्या आत दर्शनासाठी परवानगी देण्यात आली.

मात्र धम्मदीक्षा सोहळा नाकारण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष पूज्य भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध चिड व्यक्त करीत दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षेचा सोहळा नाईलाजाने बेझनबाग मैदान येथे हलविला. विशेष म्हणजे बेझनबाग येथील धम्मदीक्षेच्या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

एकीकडे महाविकास आघाडी सरकारने दीक्षाभूमीवर अखंडपणे सुरू असलेली धम्मदीक्षा सोहळ्याची परंपरा खंडीत करण्यास भाग पाडणे व दुसरीकडे हलविण्यात आलेल्या सोहळ्याचे उद्घाटन त्याच सरकारमधील मंत्र्याने करणे ही बाब समाजामध्ये तेढ निर्माण करणारी असून राज्य सरकारचे असे कृत्य चुकीचा पायंडा पाडण्याचे षडयंत्र आहे. राज्य सरकारचे हे षडयंत्र कदापीही समाज सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: