चिंचगाव टेकडी येथील रामानंद सरस्वती महाराज यांचे देहावसान

चिंचगाव टेकडी येथील रामानंद सरस्वती महाराज यांचे देहावसान

कुर्डुवाडी (सोलापूर) : माढा तालुक्यातील चिंचगाव टेकडी येथील दिव्य व आध्यात्मिक अनुभुती असलेले परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. हे वृत्त समजताच महाराष्ट्रसह इतर राज्यात असलेल्या त्यांच्या लाखो अनुयायांवर शोककळा पसरली.

 

चिंचगाव टेकडी येथील श्री महादेव मंदिर सत्संग आश्रम ट्रस्ट याचे ते सर्वेसर्वा होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामिळ यासह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. दररोज ध्यानधारणा, योग यासह त्यांची दिनचर्या नियोजनाबद्ध होती.

 

कुर्डुवाडी शहरापासुन सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचगाव टेकडी येथे 1962 साली रामानंद सरस्वती महाराज वास्तव्यास आले. ते उत्तर प्रदेश येथून आले असल्याचे सांगितले जाते. पुर्वीचे माळरान असलेल्या टेकडीवरील छोट्या मंदीराचे जीर्णोद्धार करत त्यांनी श्री महादेवाचे भव्य मंदिर व सभामंडपाची उभारणी केली. मुख्य गाभा-यामध्ये श्री गणेश, श्री विठ्ठल व श्री दत्त यांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठापणा केली. या कळसारोहण सोहळ्यासाठी अनेक राज्यातील वेदशास्त्रसंपन्न विभुतींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढ महिन्यात चिंचगाव टेकडी येथून पंढरपूरला निघत असलेली ब्रम्हलीन तपकीरे महाराज यांची दिंडी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंडीत सतराव्या स्थानी असते. त्यांनी पंढरपूरसह इतर धार्मीक ठिकाणी सेवामठांची उभारणी केली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्संग आश्रमाच्या वतीने पूरग्रस्त व कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान सहायता व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये लाखो रुपयांची मदत केली आहे. श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध करण्यात आला होता. कुर्डुवाडी रेल्वे कारखाना व चिंकहिल येथील रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्र याबाबत त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

मंदिरात दर पोर्णिमेला हरीपाठ, प्रवचन, किर्तन, भजन यासह विवीध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मोफत आरोग्य शिबिरे, संतांच्या जयंती, पुण्यतिथींचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील भाविकांसह पंचक्रोशीतील लाखो भाविक या ठिकाणी येतात. त्यांनी ‘ब’ तीर्थक्षेत्र असलेल्या या चिंचगाव टेकडी येथे राहण्यासाठी भव्य भक्तनिवासाची उभारणी करण्यात केली. त्याठिकाणी महाप्रसाद दिला जातो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: