दसरा मेळाव्यादिवशी एकाच वेळी ठाकरे अन् शिंदेंचं भाषण सुरु झालं तर आधी कुणाचं ऐकणार? अजितदादा म्हणतायत की,

 

सध्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. एकाच दिवशी हे दोन नेते दसरा मेळाव्यात भाषण करणार आहेत. याची वेळ अद्याप निश्चित झाली नसली तरी दोघांचं भाषण एकाचवेळी सुरु झालं तर नेमकं भाषण ऐकायचं कुणाचं हा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर दिलं आहे.

अजित पवारांनी म्हटलं की, मोठे राजकीय मेळावे घडतात, तेव्हा पोलिस यंत्रणा लागते. आता त्या दोघांमध्ये इर्षा निर्माण झाली आहे. दोघांचं भाषण एकाच वेळी सुरू झालं तर आधी उद्धव ठाकरेंचं बघणार. नंतर एकनाथ शिंदेंचं बघणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत ऋणानुबंध जपू, असंही ते म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, अशोक चव्हाण आमच्याकडे आले नव्हते. 2014 ला काय झालं ते बघा. शिळ्या कढीला ऊत येतो. तसं आणू नका. बच्चू कडू यांनी केलेल्या मारहाणीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मतदारांना चांगली लोक निवडून यावी. लोकांना मुस्काटात मारणारी, बंदूक काढणारी लोकं नको असतात. बच्चू कडूंनी केलेली मारहाण योग्य वाटत नाही, असंही ते म्हणाले.

चांदणी चौक पुलासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, तज्ज्ञांनी सांगितलं पूल पाडण्याशिवाय गत्यंतर नाही. पाणी तुंबल्याच्या घटनांवर बोलताना ते म्हणाले की, पुण्यात प्रशासक आहे. मागे पाच वर्षे सरकार कोणाचे होते? असा सवाल त्यांनी केला तसेच पुण्याचा वाढीव पाण्याची गरज आहे. मुळशीच पाणी देण्याची मागणी केली होती, असंही त्यांनी सांगितलं. पोलिस PFI प्रकरणी तपास सुरू आहे असं म्हणतात. पण तपास लवकर संपवावा असंही अजित पवार म्हणाले

Team Global News Marathi: